प्रतिनिधी ( बीड )३०.१०.२०२३
बीड जिल्ह्यात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालू आहेत. दिनांक 29.10.2023 च्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनास आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. आजही आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केली व काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत. यामूळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेची मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत असल्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ/ मुंडे यांनी दिले आहेत.