सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( अहमदनगर ) १४.१०.२०२३
११३ वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बॅंकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे. त्यामुळे खातेदार, सभासद, ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सभासदांनी पुढाकार घेत रविवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ०४:०० वाजता लालटाकी येथील खाकीदास बाबा मठात व्यापक बैठक बोलाविली आहे. या बैठकीत ठेवी परत मिळण्याची पुढील प्रक्रिया तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती बॅंकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली.
बॅंकेचे माजी कर्मचारी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राजेंद्र चोपडा यांनी सांगितले की, अतिशय दीर्घ परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेट केल्यापासून मोठे ग्रहण लागले. बॅंकेचे तत्कालीन चेअरमन तथा दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या संचालकांनी तसेच तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांना साथ देत मोठा गैरकारभार करून हजारो ठेवीदारांना अडचणीत आणले. २०१४ नंतर आता पर्यंत सुमारे थकबाकीचा आकडा सुमारे ८०० कोटींवर पोहोचला आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पुन्हा तेच संचालक निवडुन आले. त्यांनी मोठ मोठी आश्वासने देऊनही थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. माजी चेअरमनच्या चिरंजीवानी तर अनेक कर्जदारांना थकबाकी भरू नका बॅंक बंद होणार आहे असे सांगण्याचा पराक्रम केला.
नगर अर्बन बँकेच्या गैरकारभाराबाबत वेळोवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण, केंद्रीय सहकार निबंधक, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांना दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांनी बॅंकेत वेळोवेळी केलेले घोटाळे निदर्शनास आणून दिले व कडक कारवाई करण्याची मागणी केली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भ्रष्टाचारा विरोधात कडक भूमिका घेतली आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा असेच त्यांचे धोरण असते. दुर्दैवाने त्यांच्याच पक्षाचे खासदार, केंद्रीय मंत्री राहिलेल्या स्व. दिलीप गांधी यांनी आपल्या बगलबच्च्यांना सोबत घेऊन ऐतिहासिक अशा बॅंकेला बुडविण्याचे काम केले. आता रिझर्व्ह बँकेने बॅंकिंग परवाना रद्द केल्यावर विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक केंद्रीय निबंधक, रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून परवानगा पुन्हा मिळवू असा गाजावाजा करत आहेत. असे झाले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. प्रसंगी मी स्वतः दिल्लीला सोबत घेऊन आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहे.
बॅंकेतील घोटाळ्यांची पोलिस चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखा फॉरेन्सिक ऑडिट करून पुढील कारवाई करणार आहे. यासंदर्भात आणखी पाठपुरावा करण्याचा विषय बैठकीत होईल. सर्व सभासद, ठेवीदार, खातेदारांनी रविवारच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी केले आहे.