प्रतिनिधी ( निंबळक ) १९.१०.२०२३
निंबळक रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने निंबळक आणि पंचक्रोशीतील अनेक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. भविष्याचा विचार करता या ठिकाणी फक्त उड्डाणपूल योग्य ठरणार आहे. रेल्वेगेट मध्ये होणारा वेळेचा अपव्यय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात यावा या
मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी पंचायत समिती सदस्य पोपट निमसे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, बाळासाहेब कोतकर, दत्तुमामा दिवटे, विकास घोलप, संदिप कोतकर, दीपक शिंदे आणि परीसरातील नागरीक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, निंबळक रेल्वे गेट रस्ता हा एमआयडीसी व नगर शहराला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून रहदारीचे प्रमाण अधिक आहे. एमआयडीसी मधील कामगार, विद्यार्थी, दूध उत्पादक, शेतकरी, नोकरदार, यांची मोठ्या प्रमाणावर येजा असते रेल्वे जाण्या - येण्याची संख्या अधिक असल्याने गेट वारंवार बंदच असते. भविष्यात रेल्वे विस्तारीकरण झाल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागेल. यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली आहे.