प्रतिनिधी ( मुंबई ) १३.१०.२०२३
कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या योजनेची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सन्मान केला.
शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालये येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या जयंती आणि पुण्यतिथी यांच्या यादीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती व पुण्यतिथीचा समावेश नाही. शिक्षणाच्या परिघाबाहेर असणाऱ्या प्रत्येकांसाठी शाळा सुरु करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाचा अभूतपूर्व प्रसार झाला. त्यांचा शासनाच्या या यादीत समावेश होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा या यादीत समावेश करून त्यांचा सन्मान करावा असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी सुरु केलेल्या कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रतितास ४५ रूपये एवढी रक्कम दिली जाते. परंतु हि रक्कम अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. हि रक्कम किमान ६० रूपये प्रतितास असणे आवश्यक आहे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. कमवा व शिका हि योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असून या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले आहे. यातून मिळणारा मोबदला वाढविल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.तरी शासनाने या योजनेसाठीचा निधी वाढवून देण्यासंबंधी सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात यावा असंही त्या यावेळी म्हणाल्या.