बुरुडगाव येथील भाकपच्या कार्यालया पासून मोर्चाची सुरुवात झाली. जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला असता यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक करुन कोतवाली पोलीस स्टेशनला आणण्यात आले. काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले. कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, आरोग्य अधिकारी आशा सेविकांना नोटीस बजावून कामावर हजर होण्यास सांगत आहे. कामावर हजर न झाल्यास मानधन रोखून कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संप कायदेशीर असून, नियमाने अगोदर नोटीस देऊन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. सुरेश पानसरे म्हणाले की, प्रधानमंत्री यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमात आशा सेविकेला गुपचूप पणे स्टेजवर बोलवून बोनस कार्ड देण्यात आले. मात्र त्यांना किमान वेतन व त्यांचे न्याय हक्क मिळण्याची गरज आहे. शासनाला जागे करण्यासाठी हा संप सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुवर्णा थोरात यांनी आशा सेविका व गट प्रवर्तकांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास कोणत्याही कारवाईला न घाबरता आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचा इशारा दिला.
आशा वर्कर यांना आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड बाबतचे काम बळजबरीने करुन घेतले जात आहे. आशा वर्कर या कमी शिकलेल्या असून, त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजी मध्ये ऑनलाईन माहिती भरणे अत्यंत किचकट व अवघड असून, हे काम बळजबरीने काम करून घेतले जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे.
आशा वर्कर यांना ऑनलाईनची कामे देऊ नये, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते लागू करावे, जोपर्यंत शासकीय कर्मचारीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी (एनएचएम) प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, कंत्राटी कर्मचारी यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व बोनस 15 टक्के गटप्रवर्तक यांना देऊन त्यांना सुट्ट्या लागू कराव्या, प्रवास भक्ता वेगळा द्यावा, गटप्रवर्तकांचे नाव बदलून आशा सुपरवायझर करावे, गटप्रवर्तकांना विना मोबाईल ऑनलाईन कामे सांगण्यात येऊ नये, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट द्यावी, आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ मिळवून द्यावी, आशांना किमान वेतन लागू करावे, अशा वर्कर यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्यावर दबाव आणि बळजबरीने कामे करुन घेण्याचा प्रकार थांबवावा, आशांना दरमहा वेतन द्यावे व प्रत्येक महिन्याला त्याची पगार स्लिप देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना देण्यात आले.