प्रतिनिधी ( अहमदनगर )११.१२.२०२३
सकल भारतीय समाज, बळी महोत्सव समितीसह लोकशाहीवादी समविचारी पक्ष आदी पुरोगामी पक्ष संघटनांनी शेतकऱ्यांच्या बळीराजाचा अपमान करणारे चित्र प्रसारीत करणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना पत्र देत मागणी केली. त्याच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत
त्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की, महाराष्ट्र तसेच देशाच्या अनेक राज्यांमधील कष्टकरी शेतकरी समुह सम्राट बळीराजाला आपली अस्मिता मानतात. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांच्या घरातील माताभगिनी औक्षण करताना, "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो" असा आशिर्वाद देतात. दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी आपल्या शेतामध्ये बळीचे पूजन करतात. अहमदनगर शहरात सकल भारतीय समाजातील शेतकऱ्यांची लेकरं गेल्या १५ वर्षांपासून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बळीमहोत्सव व सम्राट एकलव्य जयंती साजरी करून बळीराजाची गौरव मिरवणूक काढत असतात. त्यामधून शेतकरी आदिवासी समुहाचे प्रश्न ऐरणीवर येवून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो, हे आपणास माहिती आहे.
पुढे म्हटले आहे, इतिहासकाळात शेतकऱ्यांच्या महान बळीराजाला बटू वामन या आक्रमकाने कपटाने ठार मारल्याचे महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या 'गुलामगिरी' ग्रंथात सिद्ध केले आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बळीराजावर विस्तृत असा बळीवंश नावाचा ग्रंथ लिहून कष्टकरी शेतकरी बळीराजाचा इतिहास जगासमोर आणला आहे. असे असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी फेसबुक या सोशल माध्यमावर बळीराजाच्या मस्तकावर वामन पाय देऊन उभे असल्याचे काल्पनिक चित्र प्रसारित करून तमाम शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. कारवाई टाळण्यासाठी चाकणकर या आपल्या पदाचा गैरवापर करुन दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे. तरी प्रशासनाने रुपाली चाकणकर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन न्याय द्यावा.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भैरवनाथ वाकळे, सतीश निमसे, संतोष गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे दिगंबर भोसले, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, तुषार सोनवणे, आम आदमी पक्षाचे राजेंद्र कर्डीले, ॲड. विद्या जाधव-शिंदे, शेतकरी संघटनेचे नितीन गव्हाणे आदी उपस्थित होते.