राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केलेल्या कार्यवाहीची त्यांना माहिती दिली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले की, सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी जे-जे काही करायचं आहे, ते सगळं करण्याची तयारी असल्याचे सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, असेही ते म्हणाले होते. आरक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, त्यामुळे शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घ्यावी. सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. राज्यातील कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनासह न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. आरक्षणासाठी ज्या त्रुटी असतील, त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव निमित्त साखळी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिली. आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही कारणाने समाजा-समाजात वितुष्टता येऊ नये, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.