प्रतिनिधी ( यवतमाळ ) ०९.१२.२०२३
या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाकरिता केंद्र व राज्य सरकारने पिकविमा मंजूर केला आहे. या पिकविम्यापोटी शिवणी जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी दिलीप वामन राठोड यांना ५२ रुपये ९९ पैसे इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना उपहासात्मक पत्र लिहून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
Read Also: विविध मागण्यांकरीता वडाळ्यातील युवकाचा आमरण उपोषणाचा इशारा
दिलेल्या पत्रात ते म्हणतात ५२ रुपये ९९ पैसे इतका भरीव पिक विमा मंजूर केल्याने मी खूप आनंदित झालो आहे. ही रक्कम माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्यासाठी ५० खोक्यापेक्षाही मोठी आहे. ही रक्कम नेण्यासाठी मी वडिलोपार्जित तिजोरी व बैलगाडी आणली आहे. रस्त्यात लुटमार किंवा दरोडा पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पिकविम्याच्या रकमेवर लागली आहे. ही रक्कम माझ्यासाठी खूप महत्त्वाची असून यामधून मी सावकाराकडून दिडीतिडीने घेतलेले कर्ज फेडीन ,पिकाची नासाडी करणाऱ्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करीन ,रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बायकोला दवाखान्यात नेईल ,अनेक महिन्यांपासून फाटक्या कपड्यात शाळेत जाणाऱ्या पोराला नवीन कपडे घेईल, वयात आलेल्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न करेल कुटुंबाला सोबत घेऊन गुवाहाटीला फिरायला नेईल आणि देशी-विदेशी महागड्या गाड्यांच्या प्रदर्शनासाठी पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना भरीव आर्थिक मदत देईल. उरली-सुरली रक्कम तिजोरीत सांभाळून ठेवीन.
पिक विम्याची ही रक्कम मला व माझ्या कुटुंबासाठी खूपच महत्त्वाची आहे. मात्र एवढी मोठी रक्कम घरी नेताना मला लुटमारीची खुप भिती वाटत आहे. त्यामुळे माझ्या व पिकविम्याच्या रकमेच्या सुरक्षेसाठी किमान सहा सशस्त्र पोलिस पुरवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.