सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( अहमदनगर ) १७.०३.२०२४
यंदा होऊ घातलेली लोकसभा निवडणूक अहमदनगर नावानेच होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी स्पष्ट केले. याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी कोळेकर यांना बैठकीदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले.
कालपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेची राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपा वगळता जिल्ह्यातील सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरूवातीस बाळासाहेब कोळेकर यांनी सर्वांचे स्वागत करून संपुर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकी दरम्यान राजू भगत, ज्ञानदेव वाफारे, राजू आघाव आदींनी काही प्रश्न विचारले. राजू आघाव यांनी निवडणूक आयोग भाजपाच्या हातचे बाहुले होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून आमचे पक्ष आयोगास सहकार्य करतील असे सांगितले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी तथा वैभवशाली अहमदनगरचे भैरवनाथ वाकळे यांनी ही निवडणूक प्रक्रिया अहमदनगर की अहिल्यानगर या नावाने होणार ? हा प्रश्न विचारला. त्यावर कोळेकर यांनी अहमदनगरचा. असे उत्तर दिले. ते पुढे म्हणाले अहिल्यानगरची प्रक्रीया पूर्ण नसल्याने अहमदनगर याच नावाने निवडणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस आम आदमी पार्टी, मुळ शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीच नामांतराची प्रक्रिया झालेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथेही मतदारसंघांना जुनीच नावे ठेवण्यात आल्याचे यापूर्वीच तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्या नावांचीही प्रक्रियाही केंद्रीय पातळीवर प्रलंबित असल्याची माहिती आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने प्रेरीत नामांतराची या निमित्ताने पोलखोल होत असल्याचे दिसून येत आहे.